'पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क्स महानियंत्रक कार्यालय’ (CGPDT) येथे आढावा बैठक संपन्न
31 जुलै 2021 रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत ‘पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क्स महानियंत्रक कार्यालय’ (CGPDT) येथे एक आढावा बैठक घेतली. कार्यालयाने चालविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी घेतला. तसेच, बौद्धिक संपदा अधिकारविषयक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याविषयी चर्चा केली.
पेटंट, डिझाईन्स स्वामीत्व हक्क आणि ट्रेडमार्क्सची तपासणी आणि मंजूरी देण्याच्या प्रक्रियेत झालेल्या सुधारणांविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
▪️ठळक बाबी...
भारतात पेटंट, संरचना, ट्रेडमार्क्स, GI सिस्टिम यांची व्यवस्था अधिकाधिक सुदृढ करण्यासाठी केंद्रीय सरकार कटिबद्ध आहे. देशात नवोन्मेष आणि संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच, भारताच्या पारंपरिक व्यवस्थेतून नवनवी संशोधने जागतिक व्यासपीठावर आणण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.
संपूर्ण देशात महिला उद्योजक, स्टार्टअप तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना भराव्या लागणाऱ्या शुल्कात जवळपास 80 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे लघुउद्योजक, महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कार्यालयात कोणतेही अर्ज अथवा समस्यांचा निपटारा करण्यासाठी नवी कालमर्यादा आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिजिटल पद्धतीचा वापर केला जात आहे. उदाहरणार्थ, ट्रेडमार्क नियम 74 याच्या अर्जाच्या जागी आता आठ एकत्रित अर्ज असतात.
गेल्या पाच सहा वर्षात भारतात पेटंट, स्वामीत्व हक्क यांना मंजूरी देण्याच्या प्रक्रियेत जलद गतीने वाढ झाली आहे. 2015-16 या वर्षामध्ये 6,326 पेटंटना मंजूरी देण्यात आली होती, जी संख्या तुलनेत 2020-21 या वर्षामध्ये 28,391 पर्यंत पोहचली आहे. तसेच, ट्रेडमार्क नोंदणीत वाढ झाली असून 2020-21 या वर्षामध्ये 2,55,993 मंजुऱ्या देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, कॉपीराइट म्हणजेच स्वामीत्व हक्क देण्यात त्यांची संख्या गेल्या आर्थिक वर्षात 16,402 पर्यंत पोहोचली.
▪️पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क
महानियंत्रक कार्यालय...
पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क महानियंत्रक कार्यालय (CGPDTM) मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या उद्योग व अंतर्गत व्यापार विभागाच्या अंतर्गत हे कार्यालय कार्यरत आहे.
‘पेटंट कायदा 1970’, ‘डिझाईन कायदा 2000’ आणि ‘ट्रेडमार्क्स कायदा 1999’ या सर्व कायद्यांच्या अंमलबजावणीवर हे कार्यालय देखरेख ठेवते. तसेच, या सर्व विषयांवरील प्रकरणांवर सरकारला आवश्यक तो सल्ला देण्याचेही काम हे कार्यालय करते.
पेटंट कार्यालयाचे मुख्यालय कोलकाता इथे आहे, ट्रेड मार्क नोंदणी मुंबईत आहे, तर GI नोंदणी चेन्नईत केली जाते. पेटंट माहिती व्यवस्था आणि राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था नागपूर इथे आहे.